मेहनती, अभ्यासू उद्योजक राज्याने गमावला - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
'काकासाहेब चितळे यांनी केवळ व्यवसाय केला नाही तर दुग्ध उत्पादन कसे वाढेल तसेच चांगल्या गाई व म्हशींच्या प्रजाती कशा निर्माण होतील यासाठी संशोधनावर भर दिला. त्यांच्या निधनाने दूरदृष्टी असलेला मेहनती व अभ्यासू उद्योजक राज्याने गमावला,' अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काकासाहेब चितळे यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतरही त्यांनी वडील बाबासाहेब चितळे व भावंडा सोबत चितळे उद्योग समूहामध्ये कार्यरत राहणे पसंत केले. जायंट्स वेल्फेअर फाऊंडेशन, भिलवडी सार्वजनिक वाचनालयाचे 27 वर्षांपासून अध्यक्ष, भिलवडी शिक्षण संस्थेचे विश्वस्त व संचालक,मुंबई माताबाल संगोपन केंद्राचे आश्रयदाते, विवेकानंद नेत्र चिकित्सालय, लायन्स नँबचे आश्रयदाते अशा विविध संस्थाच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक क्षेत्रात योगदान दिले आहे.
दुग्ध उत्पादन आणि प्रक्रिया क्षेत्रात उद्योग उभारू इच्छिणाऱ्या अनेक नव उद्योजकांसाठी चितळे यांच्या उद्योगाची भरभराट ही नेहमीच प्रेरणादायी ठरलेली आहे. काकासाहेबांना विनम्र श्रद्धांजली.
महाराष्ट्राच्या डेअरी उद्योगाला जागतिक ओळख मिळवून देणे हीच काकासाहेबांना खरी श्रद्धांजली - उपमुख्यमंत्री अजित पवार
चितळे डेअरीच्या माध्यमातून महाराष्ट्राचा तसेच महाराष्ट्रातील डेअरी उद्योगाचा लौकिक वाढविणारे दत्तात्रय भास्कर तथा काकासाहेब चितळे यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुःख व्यक्त केले आहे.
महाराष्ट्राच्या डेअरी उद्योगाला जागतिक पातळीवर स्वतंत्र ओळख मिळवून देणं, हीच काकासाहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दात त्यांनी काकासाहेबांना आदरांजली वाहिली. स्वर्गीय बाबासाहेबांनी चितळे डेअरीची स्थापना केली परंतु तिला अत्याधुनिक बनवण्याचे श्रेय काकासाहेबांना जातं. दूरदृष्टी, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि तरुण पिढीवरील विश्वास हे काकासाहेबांचे वैशिष्ट्य होते. काकासाहेबांची दूरदृष्टी व कार्य हे नवउद्योजक आणि तरुण पिढीला नेहमीच मार्गदर्शन करीत राहील, असे त्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.